Tuesday, September 23, 2008

समाजाचे ऋण-

समाजाचे ऋण-
समाजाचे ऋण घेऊनच आपण या जगात जन्माला येतो आणि मेल्यानंतर देहाची व्यवस्था लावतानाही आपल्याला घ्यावेच लागतात। आपण ज्या प्रसूतिगृहात जन्म घेतो ते समाजातील कोणत्यातरी घटकाने बांधलेले असते आणि जन्म होतानाही डॉक्टर-परिचारिका-आया यांच्या मदतीनेच आपण या जगात येतो। हे समाजाचे उपकार जीवनभर तर आपल्याला घ्यावे लागतातच पण मृत्यूनंतरही इतर माणसे म्हणजे समाजच आपल्या देह विसर्जनाची व्यवस्था करतो आणि समाजाने निर्माण केलेल्या कोठल्यातरी स्मशानभूमीत हे देहविसर्जनाचे संस्कार होतात. हे सारे कोणीही कितीही श्रीमंत असला तरी स्वतःचे स्वतः करू शकत नाही म्हणून आपण कितीही ठरवले तरी समाजाचे ऋण घेणे आपल्याला अपरिहार्य आहे. मग ह्या ऋणाची जाणीव ठेऊन जगणे हाच एकमेव मार्ग आपल्यापुढे उरतो. आपण जन्मल्यापासून मोठे होईपर्यंत अनेकांचे उपकार आपल्यावर होतात. अगदी लहान असताना आजी-मावशी-आत्या-काकू आपल्याला अंघोळ घालतात. आपल्याला भरवतात. आईचे उपकार तर न फ़िटणारे आहेत. आयुष्यभर न थकता ती आपल्यासाठी जमेल ते सर्वकाही करत असते. आपल्याला चालायला बोलायला तिच शिकवते. आपल्यावर संस्कार करते. ती आपली पहिली गुरू असते. वडीलही आपल्यासाठी खूप कष्ट करतात ,त्याग करतात जे त्यांना मिळाले नाही ते सर्व आपल्याला मिळावे म्हणून सदैव प्रयत्नशील असतात. आपण ज्या शाळेत-कॉलेजमध्ये जातो ती शाळा किंवा कॉलेज आपल्या आई-वडिलांनी किंवा वाड-वडिलांनी बांधलेले नसते. याच समाजातील कोणीतरी सर्वांच्या मुलांसाठी ही व्यवस्था केलेली असते. तसेच आपल्याला शिक्षण मिळण्यामागे कितीतरी लोकांचे कष्ट असतात. आपण ज्या घरात रहातो ते घर बांधण्यासाठी कितीतरी लोकांनी कष्ट केलेले असतात. घर रंगवण्यासाठी, फ़र्निचर बनवण्यासाठी, वीज-पाणी उपलब्ध करून देण्यासाठी, किती कामगारांचे कष्ट असतात त्यांची गणतीच न केलेली बरी. वर्तमान पत्र, दूध , टी. व्ही वरील कार्यक्रम या सुविधा मिळण्यामागे किती लोकांचे कष्ट असतात बरे? आपल्याला जे अन्न मिळते ते आपल्यापर्यंत येईपर्यंत शेतकऱ्यापासून वहातूक करणारे तसेच कितीतरी लोकांनी ते डोक्यावर वाहिलेले असते. कितीतरी जणांचे त्यात कष्ट असतात तेंव्हा ते आपल्या पानात येऊन पडते. असेच आपण ज्या कपडे वगैरे इतर वस्तू वापरतो त्यांच्याबाबतीतही आहे. आपण रात्री सुखाने झोपतो पण त्याचवेळेस कितीतरी लोक जागे राहून आपली सेवा करीत असतात. तसेच आपल्या संरक्षण दलातील जवान व इतर कर्मचारी अहोरात्र आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिन राबत असतात. आपण अनेक सामाजिक सुविधांचा वापर करतो. आपण जे रस्ते वापरतो, रेल्वे-बस-विमाने व रूग्णालये-तंत्रज्ञान-विज्ञान प्रशिक्षण संस्था यांचा वापर करतो त्यामागेही अनेक लोकांचे कष्ट आहेत. आपल्याला जीवन जगताना पदोपदी समाजाचे ऋण हे घ्यावेच लागतात. म्हणून या समाजाविषयी आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे. जेंव्हा आणि जसे आपल्याला शक्य आहे तसे या समाजाला आपण देण्याचा- ऊतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री. सदगुरू पै माऊलींनी तयार केलेली विश्वप्रार्थना याच कृतज्ञता बुध्दीतून निर्माण झालेली आहे. ती म्हणण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. आणि या समाजातील अनिष्ट चालीरिती, अंधश्रध्दा. अंधविश्वास दूर व्हावा आणि हा समाज जास्तीत जास्त सुखी व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवनविद्या मिशन सारख्या संस्था समाज सुखी व्हावा यासाठी अखंड कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात आपण आपल्या परीने भाग घेतला पाहिजे.
या समाजाच्या ऋणांविषयी सर्वांना सदैव कृतज्ञता राहो व विश्वप्रार्थना सदैव सर्वांच्या मुखात राहो ही श्री. सदगुरु चरणी प्रार्थना.विठ्ठल विठ्ठल........

No comments: